Ad will apear here
Next
अमरावतीची सैर
चिखलदरा
‘करू या देशाटन’ या सदराच्या आजच्या भागात आपण विदर्भातील अमरावती आणि आसपासच्या प्रदेशातील निसर्गरम्य, तसेच ऐतिहासिक ठिकाणी फेरफटका मारू या.
...........
अंबादेवीचे प्राचीन मंदिरअमरावतीचे प्राचीन नाव उदुंबरावती असे होते. याचे प्राकृत नाव उमरावती असे होते आणि अमरावती हे नाव अनेक शतकांपासून आहे. तेथे अंबादेवीचे प्राचीन मंदिर आहे. त्यामुळे या शहराचे नाव अमरावती आहे, असा समज आहे. महाभारत काळापासून अमरावतीचे उल्लेख दिसून येतात. जुनी अमरावती येथील भगवान आदिनाथ ऋषभनाथ यांच्या संगमवरी मूर्तीच्या पायथ्याशी असलेल्या शिलालेखावर अमरावती या नावाचा पहिल्यांदा उल्लेख आढळतो. या मूर्ती इ. स. १०९७मधील आहेत. इ. स. १३००मध्ये गोविंदप्रभूंनी अमरावतीला भेट दिली. याच काळात वरहद हा देवगिरीचा राजा (यादव) येथे राहत होता. १७२२मध्ये छत्रपती शाहू महाराज अमरावती आणि बडनेरा येथे राणोजी भोसले यांना भेटले. त्या वेळी अमरावतीची ओळख ‘भोसले की अमरावती’ अशी होती. अमरावतीची पुनर्बांधणी आणी भरभराट राणोजी भोसले यांच्या काळात झाली. साधारण १४ ते १७व्या शतकापर्यंत मुघल आणि निजामाची राजवट होती. १८०५च्या जवळपास पेंढारींनी अमरावतीवर हल्ला केला. त्या वेळी अमरावतीचे सावकार आणि व्यापाऱ्यांनी अमरावतीचे संरक्षण केले.

अमरावती रेल्वे स्टेशन१८५२ ते १८७१ या काळात ब्रिटिशांनी अनेक सरकारी इमारती बांधल्या. अमरावती रेल्वे स्टेशन १८५९मध्ये, आयुक्तांचा बंगला १८६०मध्ये, न्यायालय १८८६मध्ये, तर तहसील कार्यालय आणि मुख्य पोस्ट ऑफिस १८७१मध्ये बांधण्यात आले. याच काळामध्ये कारागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, विश्रामगृह, कॉटन मार्केट बांधून झाले होते. गिल्लेवडे, सांबारवडी, रोडगे हे येथील प्रसिद्ध खाद्यपदार्थ आहेत. लोकमान्य टिळकांचे सहकारी दादासाहेब खापर्डे, विधान परिषदेचे अध्यक्षपद भूषविलेले रा. सु. गवई, रंगनाथपंत मुधोळकर, मोरोपंत जोशी, प्रल्हादपंत जोग या अमरावतीतील राजकीय क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती होत्या.

हनुमान प्रसारक व्यायाम मंडळहनुमान प्रसारक व्यायाम मंडळ :
अमरावतीत वीर वामनराव जोशी यांच्या प्रेरणेने हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाची स्थापना झाली. या व्यायामशाळेने १९३६ साली यवतमाळच्या डॉ. सिद्धनाथ कृष्ण काळे यांच्या नेतृत्वाखाली बर्लिन ऑलिम्पिकच्या वेळी भरलेल्या जागतिक व्यायाम परिषदेला आपला चमू पाठवला होता. तिथे व्यायाम परिषदेत व्यायामशाळेच्या खेळाडूंनी मल्लखांब, योगासने आणि गदा फिरवणे हे भारतीय व्यायामप्रकार करून दाखवले. प्रेक्षकांमध्ये व्यासपीठावर हिटलर, गोबेल्स आदी हजर होते.. हे राष्ट्रप्रेम पाहून हिटलरने स्वत: डॉ. सिद्धनाथ कृष्ण काळे यांना प्लॅटिनम मेडल व प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित केले. संघाच्या जाण्या-येण्याचा आणि जर्मनीत राहण्याचा सर्व खर्च औंध संस्थानचे अधिपती श्रीमंत पंतप्रतिनिधी यांनी केला होता. महात्मा गांधी, राजगुरू, सुभाषचंद्र बोस यांनी या हनुमान आखाड्याला भेट दिली होती. गुरुवर्य दामोदरपंत भिडे हे तेथे व्यायाम शिक्षक होते. त्यांचे शिष्य अनंत गणेश तथा अण्णा सोहोनी हे हनुमान प्रसारक मंडळींचे प्रमुख कार्यकर्ते. २७ सप्टेंबर १९२५ रोजी नागपूर येथे डॉ. हेडगेवार यांच्या घरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेच्या पहिल्या बैठकीला उपस्थित होते. संघातील शारीरिक शिक्षणाचे ते जनक मानले जातात. संघाची पहिली मराठी, हिंदी प्रार्थना आणि दिल्या जाणाऱ्या आज्ञा अण्णांनीच सिद्ध केल्या आहेत.

बांबू उद्यानबांबू उद्यान : अमरावतीजवळ वडाळी रोपवाटिकेजवळ नवीनच सुरू झालेले वन विभागाचे बांबू उद्यान पर्यटकांना नक्कीच आकर्षित करणार आहे. येथे बांबूच्या जगभरातील प्रकारांची झाडे असून, बांबूच्याच अप्रतिम कलाकृती, झुले, रोप-वे, सीसॉ, खेळणी प्रदर्शन कक्षही तेथे आहे. तलावाकाठी असलेले हे बांबू उद्यान शहराची शान आहे.



तपोवनतपोवन : अमरावतीला तपोवन नावाची संस्था आहे. शिवाजीराव पटवर्धन यांनी त्या संस्थेची उभारणी केली आहे. कुष्ठरोगी बांधव तिथे राहतात. लाकडाचे फर्निचर बनविणे, लोखंडाचे फर्निचर बनविणे, सतरंजी बनविणे, शेती अशा विविध प्रकारचे संस्थेचे उद्योग आहेत आणि सर्व कुष्ठरोगी बांधव तिथे काम करतात. त्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नावर संस्थेचा खर्च चालतो. १९४६ साली डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांनी कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी अमरावतीजवळ तपोवन येथे जगदंबा कुष्ठधामाची स्थापना केली. अमरावती येथील अंबादेवीचे मंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे, म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख यांनी मंदिरप्रवेश चळवळ सुरू केली. १९३२ साली त्यांनी अमरावती येथे श्रद्धानंद छात्रालय व शिवाजी शिक्षण समितीची स्थापना केली. शिवाजी शिक्षण समिती आज विदर्भातील अग्रगण्य शिक्षणसंस्था आहे. १८९७चे राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन अमरावती येथे भरले होते.

कौंडिण्यपूरकौंडिण्यपूर : ही श्रीकृष्णाची सासुरवाडी म्हणजेच रुक्मिणीचे गाव. महाभारताशी संबंधित असलेले हे ठिकाण असून, श्रीकृष्ण हा महाराष्ट्राचा जावई होता, हे फार थोड्या लोकांना माहिती आहे. या गावात रुक्मिणीचे एक छोटे मंदिर आहे. रुक्मिणीहरणाचा यादव काळातील प्रसंग येथेच घडला होता. रुक्मिणीला लग्न करायचे होते फक्त कृष्णाशीच. आई-वडिलांनी तर स्वयंवराचा घाट घातलेला. काय होणार, या चिंतेने ग्रासलेली रुक्मिणी रिवाजाप्रमाणे जगदंबेची ओटी भरायला निघाली होती आणि कृष्णाने रुक्मिणीला चक्क त्या जगदंबेच्या साक्षीनेच पळवून नेले. रुक्मिणीचे माहेर असलेल्या कौंडिण्यपुरात विठ्ठल मंदिर असल्याने येथे आषाढी व कार्तिकी एकादशीला भाविक मोठ्या संख्येने दर्शनाला येतात. त्यामुळे ‘विदर्भाची पंढरी’ अशीही कौंडिण्यपूरची ओळख आहे.

मेळघाटमेळघाट : मेळघाटमध्ये ‘सिपना’ (अर्थ सागवान) नदी महत्त्वाची आहे. मेळघाट येथे महाराष्ट्रातील पहिला व्याघ्रप्रकल्प आहे. तेथे पट्टेवाले वाघ, बिबळे, रानगवे, सांबरे, भेकरे, रानडुकरे, वानरे, चितळ, नीलगायी, चौशिंगे, अस्वले, भुईअस्वले, रानमांजरे, कृष्णमृग, उडत्या खारी, तरस, कोल्हे, लांडगे, ससे असे पुष्कळ प्राणी आढळतात. तसेच मोर, रानकोंबड्या, राखी बगळा, भुरा बगळा, करकोचे, बदके इत्यादी पक्षीही येथे आहेत. सर्पगरुड, ससाणे, घार, पोपट, सुगरण, पारवे, बुलबुल, सुतार, मैना असे रानपक्षीही येथे आहेत. चिखलदरा, सेमाडोह, गाविलगड किल्ला याच भागात असून, हा भाग वन्य प्राण्यांसाठी समृद्ध असला, तरी आदिवासींच्या कुपोषणासाठीही तो ओळखला जातो.

चिखलदराचिखलदरा : चिखलदरा या ठिकाणाचे उल्लेख महाभारतात आढळतात. याच ठिकाणी भीमाने कीचकाचा वध करून त्याला दरीत फेकून दिले. त्यामुळे त्याला ‘कीचकदरा’ असे नाव पडले. त्यावरूनच पुढे ते चिखलदरा असे झाले. महाराष्ट्रातील एकमेव कॉफी उत्पादक प्रदेश म्हणून चिखलदरा ओळखला जातो. आताशा येथे मध व स्ट्रॉबेरीचेही उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. चिखलदऱ्याची समुद्रसपाटीपासूनची उंची ३५६४ फूट आहे. त्यामुळे तेथील हवा कायम थंड आणि आरोग्यदायी असते. सातपुड्याच्या सात पर्वतरांगांपैकी मेळघाट रांगेत चिखलदरा येते. मेळघाट रांग व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित केल्यामुळे येथे वाघांच्या शिकारीला बंदी आहे. चिखलदऱ्याच्या घाटात किंवा चिखलदऱ्याहून सेमाडोहला जाणाऱ्या रस्त्यावर वाघ दिसू शकतात. मोर, रानकोंबडा, अस्वले तर बऱ्याच मोठ्या प्रमाणात आढळतात; मात्र सह्याद्रीतील सदाहरित जंगलांसारखी घनदाट हिरवीगार झाडी येथे दिसत नाही. येथील जंगल शुष्क पानझडीच्या अरण्यप्रकारात मोडते. कॉफी हे येथील मुख्य उत्पादन आहे. कॉफीला लागणारे ७० ते ८० फॅरनहाइट तापमान येथे असते. अलीकडच्या काळात चिखलदरा हे ठिकाण हळूहळू पॅराग्लायडिंगसाठी उदयास येत आहे. भारतात पॅराग्लायडिंग मोजक्याच ठिकाणी होते. पंडित नेहरू बोटॅनिकल गार्डन हे चिखलदऱ्यातील शासकीय वनस्पती उद्यान असून, तेथे अनेक प्रकारच्या वनस्पती पाहायला मिळतात. येथे अनेक प्रकारचे गुलाब असून, पोहण्याचा एक तलावही येथे आहे. अमरावतीहून चिखलदरा ९४ किलोमीटर अंतरावर आहे.

चिखलदऱ्याजवळील काही पॉइंट्स : देवी पॉइंट, नर्सरी गार्डन, प्रॉस्पेट पॉइंट, बेलाव्हिस्टा पॉइंट, बेलेंटाइन पॉइंट, भीमकुंड, मंकी पॉइंट, लॉग पॉइंट, लेन पॉइंट, वैराट पॉइंट, हरिकेन पॉइंट

सेमाडोहसेमाडोह : सेमाडोह हे मेळघाट अभयारण्यातील विश्रांतीस्थळ आहे. वनविभागाची पर्यटक निवास व्यवस्था येथे आहे. तसेच सुंदर म्युझियमही आहे. पेंढा भरलेले वाघ, हरिणे आणि गवे हे येथील मुख्य आकर्षण. येथील कुटीरनिवास खूपच छान असून, येथून मेळघाटाची सैर घडविण्यात येते. मला येथे मुक्काम करण्याची संधी १९९०मध्ये मिळाली होती. त्या वेळी रात्री सर्च लाइट टाकून जंगलात फिरता येत असे. मुंघेरी नावाच्या गाइडने रात्री आम्हाला जंगलात फिरविले. एक ठिकाणी ओढ्यात आमची गाडी फसली. ड्रायव्हरने सर्वांना खाली उतरण्यास सांगितले. खाली उतरल्यावर पाहतो तर काहीच दिसेना. डोक्यावर झाडांतून फक्त चांदण्या चमचमताना दिसत होत्या. देवाचे नाव घेत सर्वांनी एकमेकांना पकडून ओढा पार केला व गाडीत बसल्यासार सुटकेचा निःश्वास सोडला.

गो. नी. दांडेकरअचलपूर-परतवाडा : ही जुळी गावे आहेत. परतवाडा येथे वन विभागाचा मोठा सागवान डेपो आहे. तसेच सागवानाचे अनेक व्यापारी येथे आहेत. सॉ मिल्स, लाकूडकाम करणारे अनेक कारागीर आणि फर्निचरची खूप दुकानेही येथे आहेत.

या लेखात पर्यटनप्रेमी साहित्यिक गो. नी. दांडेकर यांचा उल्लेख अपरिहार्य आहे. दुर्गप्रेमी गो. नी. दांडेकर यांचा जन्म परतवाडा येथे झाला. त्यांचे वडील शिक्षक होते. वयाच्या १२ व्या वर्षी ‘गोनीदां’नी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेण्यासाठी पलायन केले. त्यासाठी त्यांनी सातव्या इयत्तेमध्ये शाळा सोडली. त्यानंतर गोनीदा संत गाडगे महाराजांच्या सहवासात आले. त्यानंतर ते गाडगे महाराजांचा संदेश पोहोचवण्यासाठी गावोगाव हिंडले.

गाविलगड किल्लागाविलगड किल्ला : गाविलगड हा किल्ला चिखलदऱ्याजवळ, मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये आहे. किल्ल्याच्या भोवती घनदाट जंगल आहे. १२व्या-१३व्या शतकात गवळ्यांनी बांधलेला हा किल्ला नंतर बलाढ्य गोंडांनी घेतला. गाविलगड हा वैभवशाली बांधकाम असलेला किल्ला विदर्भाचे भूषण आहे. हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारचा असून, तो अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यामध्ये आहे.

सालबर्डीसालबर्डी : हे पर्यटनस्थळ मोर्शीपासून आठ किलोमीटर अंतरावर आहे. येथे महादेवाचे जागृत ठिकाण आहे. येथील गरम पाण्याचे झरे हे एक प्रमुख आकर्षण आहे. संत मारुतीमहाराजांची समाधी आणि महानुभाव पंथाचे प्रसिद्ध मंदिर ही येथील काही ठळक आकर्षणे आहेत. महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सीमेवर मोर्शी तालुक्यात उंच पहाडावर डोंगराच्या गुहेत २५ ते ३० फूट खोलीवर स्वयंभू महादेवाची पिंडी आहे, ज्यावर पहाडातून सतत जलाभिषेक सुरू असतो. तसेच गरम व थंड पाण्याचे कुंड असून, त्यात आंघोळ केल्याने त्वचारोग बरे होतात, अशीही भाविकांची श्रद्धा आहे.

शेणगाव : गोरगरीब, दीनदलित यांचा ऐहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी, अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे संत गाडगेमहाराज यांचे हे जन्मस्थळ. त्यांनी अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम व विद्यालये सुरू केली.

मोझरीमोझरी : येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गुरुकुंज आश्रम व त्यासमोर त्यांची समाधी आहे. त्यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील यावली (अंजनगाव सुर्जी) येथे झाला.
नांदगाव खंडेश्वर : हेमाडपंती प्रकारातील हे अतिशय सुंदर मंदिर पर्यटक व यात्रेकरूंचे श्रद्धास्थान आहे.

ऋणमोचन : ही संत गाडगेबाबांची कर्मभूमी. संत गाडगेमहाराजांनी ऋणमोचन या अमरावतीपासून जवळच्या गावी गोरगरिबांची सेवा केली. त्यांनी अपंगांसाठी अन्नछत्र याच ठिकाणी उभारले. ऋणमोचन म्हणजे पितरांच्या ऋणातून मुक्त होणे. ऋणमोचन येथील प्रत्येक देवस्थान पूर्णा (पयोष्णी) नदीच्या तीरावर असू,न तिचा प्रवाह पूर्ववाहिनी असल्याने हे तीर्थ म्हणून पुण्यकारक समजले जाते. गणेश पुराणकर्त्या मुद्गल ऋषींचा आश्रम येथे होता. रुक्मिणीहरणावेळी परत जाताना श्रीकृष्ण व रुक्मिणी येथे आल्याचा उल्लेखही आढळतो. भगवान मुद्गलेश्वर म्हणजेच महादेवाचा अवतार होय. महादेव म्हटले म्हणजे सोमवारचे महत्त्व असते; पण येथे ऋणमोचनला रविवारचे महत्त्व असून, पौष महिन्यातील रविवारला अधिक महत्त्व आहे.

माधान : हे संत गुलाबराव महाराज यांचे जन्मस्थान असून, यांच्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. अंध असूनही त्यांनी १२५ ग्रंथ लिहिले. त्यांची छापील पाने सुमारे सहा हजार भरतील. २७ हजार ओव्या, अडीच हजार अभंग, तेवढीच पदे आणि तीन हजार श्लोकादि रचना आदींचा त्यात समावेश आहे. माधान हे ठिकाण अमरावतीपासून ४० किलोमीटर अंतरावर आहे.

लासूर : दर्यापूर तालुक्यातील पूर्णा नदीच्या काठावर वसलेल्या लासूर येथे रामदेवराव यादव यांनी बांधलेले आनंदेश्वर महादेव मंदिर असून, ते हेमाडपंती आहे. हा वास्तुशिल्पाचा सुंदर ठेवा आहे. मंदिराला तीन गाभारे असून, सभामंडपातील सर्व खांब अतिशय कलात्मक आहेत. त्यावर विविध आकृत्या, तसेच देवी-देवतांच्या प्रतिमा, कुंभ, वेलबुट्ट्या, साखळ्या कोरल्या आहेत. खांबावरील यक्षप्रतिमा अशा बसविलेल्या आहेत, की देऊळ यक्षांनीच तोलले आहे वाटावे. हे ठिकाण अमरावतीपासून ६२ किलोमीटर, तर दर्यापूरपासून १६ किलोमीटर आहे.

रिद्धपूर : हे महानुभाव पंथाच्या भक्तांचे एक पवित्र स्थान आहे. या परिसरातील अनेक मठांमध्ये भाविकांची उत्तम सोय होते.




बहिरम : मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेले चांदूरबाजार तालुक्यातील बहिरम हे ठिकाण तेथील यात्रांसाठी प्रसिद्ध आहे. येथे मातीच्या मडक्यात चुलीवर शिजलेले मटण व खमंग भाकरीची चव चाखण्यासाठी दर वर्षी हजारो लोक या यात्रेत सहभागी होतात. बहिरमची यात्रा साधारण ३५० वर्षांहून अधिक काळापासून भरते. काहींच्या मते ती हजारो वर्षांपासून भरत आहे. सातपुड्याच्या कुशीत वसलेले ‘बहिरम बुवा’ हे लोकदैवत आहे. या ठिकाणाबाबत एक आख्यायिकाही आहे. शंकर-पार्वती प्रवास करीत असताना एकदा या ठिकाणी थांबले होते. निसर्गकुशीतील हे ठिकाण पार्वतीला आवडले. पार्वतीने शंकराला येथे दर वर्षी येण्याची गळ घातली. त्यावर शंकराने माझा एक अंश नेहमीसाठीच या ठिकाणी ठेवतो, असे सांगितले. शंकराचे रुद्ररूप असलेले हे ठिकाण ‘भैरवाचे ठिकाण’ म्हणून ओळखले जाऊ लागले.

अमरावतीमधील पाटबंधारे प्रकल्प :
अप्पर वर्धा धरण (नल-दमयंती सागर) : शहानूर धरण

ढाकणा-कोलकाज अभयारण्य : सिपनाच्या घनदाट जंगलाने वेढलेले व डोलार नदीच्या किनारी वसलेले हे अभयारण्य असून, इथल्या नैसर्गिक वनसंपदेमुळे ते पर्यटकांना आकर्षित करते. ढाकणा हे ठिकाण व्याघ्रप्रकल्पासाठी निवडले गेले आहे.

गुगामल : मेळघाटच्या पश्चिमेला लागूनच १६७३ चौरस किलोमीटर क्षेत्रावर गुगामल राष्ट्रीय उद्यान १९८७मध्ये अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. इथे पट्टेवाले वाघ, बिबळे, रानगवे, सांबरे, भेकरे, रानडुकरे, वानरे, चितळ, नीलगायी, चौशिंगे, अस्वले, भुईअस्वले, रानमांजरे, कृष्णमृग, उडत्या खारी, तरस, कोल्हे, लांडगे, ससे असे पुष्कळ प्राणी आढळतात.

अमरावतीच्या उत्तरेस मध्य प्रदेशातील मुक्तागिरी हे जैनधर्मीयांचे पवित्र क्षेत्र आहे. सातपुड्याच्या पर्वतरांगेतील हे ठिकाण अत्यंत निसर्गरम्य तर आहेच; पण येथील मंदिरेही बघण्यासारखी आहेत. परतवाडा बैतुल मार्गावर थोड्या आतील बाजूस असलेले हे ठिकाण अवश्य पाहण्यासारखेच.

अमरावती हे शहर रेल्वे आणि महामार्गाने मोठ्या शहरांशी जोडलेले आहे. हे शहर मुंबई-कोलकाता महामार्गावर असून, रेल्वे मार्गावर बडनेरा येथून जाता येते. बडनेरा ते अमरावती रेल्वेमार्गही आहे. अचलपूर-परतवाड्यापर्यंत अकोल्याहूनही रेल्वे आहे. जवळचा विमानतळ नागपूर. अमरावती येथे राहण्याची उत्तम सोय आहे.

- माधव विद्वांस
ई-मेल : vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BZNFBN
 Thanks khup chhan1
 Very informative1
 Very nice, info,pictures.1
 छान माहिती आहे आपल्या माहितीची त्या शहरात गेल्या नंतर आठवण होते1
 छान माहिती1
 अमरावती या छानशा शहराची विविध माहिती आपण भरपूर मेहनत घेऊन प्रसिद्ध केली,मी अनेक ठिकाणी ही माहिती शेअर/फॉरवर्ड करणार आहे,धन्यवाद
सुहास सोहोनी,94053493542
 खूप छान सविस्तर माहिती
 Marvelous explication of places. Splendid Vidharbha.1
 Masta mahiti.
Danyvad.
 Khup chan mahiti sangitli sir.......
 अपरिचित स्थळाची सचित्र सुंदर माहिती!
 सुंदर माहिती
 बरेच ठिकाण माहिती नव्हते .सविस्तर वर्णन🙏👌👌
Similar Posts
शेगाव, लोणार आणि अकोला महाराष्ट्रातील घराघरांत ज्यांच्या चरित्राची पारायणे केली जातात, त्या गजानन महाराजांचे शिस्तबद्ध शेगाव, एक नैसर्गिक आश्चर्य असलेले लोणार येथील अद्भुतरम्य सरोवर आणि कापूस उत्पादक अकोला जिल्ह्यातील सर्व प्रकारची पर्यटनस्थळे यांची सफर.... ‘करू या देशाटन’च्या आजच्या भागात...
वर्धा, वाशिम, यवतमाळ वर्धा, वाशिम, यवतमाळ हे तिन्ही जिल्हे म्हणजे विदर्भातील स्वतंत्र ओळख असलेले जिल्हे आहेत. ‘करू या देशाटन’ सदराच्या आजच्या भागात या जिल्ह्यांतील काही पर्यटनस्थळांबद्दल जाणून घेऊ या.
सामाजिक वनीकरणाच्या रोपवाटिकेत १५ मजुरांकडून एक लाख रोपे अचलपूर (परतवाडा, अमरावती) : राज्यभरातील वृक्षारोपण मोहिमेसाठी सामाजिक वनीकरण रोपवाटिकेतील अनेक मजुरांनी उन्हाचे चटके सोसत हिरवी रोपे फुलवली आहेत. ही वृक्षारोपण मोहीम यशस्वी करण्यात त्यांचे योगदान मोलाचे आहे. कष्टाने तयार केलेली ही रोपे वाया घालवू नका. ती जगवा, वाढवा असे आवाहन त्यांनी केले आहे.
‘जलयुक्त’च्या पुरस्कारांची घोषणा अमरावती : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत विविध पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यातील पुरस्कारप्राप्त गावे, तालुके, पत्रकारांना आठ नोव्हेंबर रोजी अकोला येथे होणाऱ्या कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे. जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. जलयुक्त

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language